उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बारामती येथील राष्ट्रवादी भवनात सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना आज सुरुवात झाली.
या निवडणुकीसाठी विविध प्रवर्गातून मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थिती लावली. विशेष म्हणजे महिला प्रतिनिधींचा मोठ्या प्रमाणावर सहभाग पाहायला मिळाला. महिला इच्छुकांच्या मुलाखती यावेळी सुनेत्रा पवार यांनी स्वतः घेत त्यांच्या सामाजिक व सहकार क्षेत्रातील कार्याचा तसेच निवडणुकीसंदर्भातील भूमिका व अपेक्षांचा आढावा घेतला.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी, सभासद, कामगार तसेच परिसराच्या विकासाला अधिक गती देण्याच्या दृष्टीने सक्षम आणि सक्रिय नेतृत्वाला संधी देण्यावर यावेळी चर्चा झाली. मुलाखतीच्या प्रक्रियेला इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, महिला प्रतिनिधींच्या वाढत्या सहभागामुळे सहकार क्षेत्रातील महिलांच्या सक्रिय सहभागाचे चित्र यानिमित्ताने अधोरेखित झाले.