राज्यातील शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण कष्टकरी जनतेच्या ज्वलंत प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली आज अकोले येथून भव्य राज्यव्यापी वाहन लाँग मार्चला सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या २० हून अधिक जिल्ह्यांतून आलेल्या १,००० हून अधिक वाहनांमधून १२,००० हून अधिक शेतकरी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. २०० किलोमीटरहून अधिक अंतर कापून हा लाँग मार्च मुख्यमंत्री निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याकडे कूच करीत आहे. प्रत्येक वाहनावर फडकणारे किसान सभेचे लाल झेंडे, मागण्यांचे बॅनर्स आणि शेतकऱ्यांनी अभिमानाने धारण केलेले लाल बिल्ले यांमुळे संपूर्ण परिसर संघर्षाच्या निर्धाराने भारावून गेला आहे.
वाहन लाँग मार्च सुरू होण्यापूर्वी अकोले शहरातून शेकडो लाल झेंड्यांसह आणि गगनभेदी घोषणांनी दुमदुमणारा भव्य पायी मोर्चा काढण्यात आला. अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, राष्ट्रीय महासचिव डॉ. विजू कृष्णन, राष्ट्रीय सहसचिव डॉ. अजित नवले, भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)चे आमदार विनोद निकोले, किसान सभेचे राज्य अध्यक्ष यशवंत झाडे, राज्य सचिव उमेश देशमुख, राज्य खजिनदार सदाशिव साबळे, तसेच राज्य पदाधिकारी किसन गुजर, रडका कलांगडा, किरण गहला, चंद्रकांत धांगडा, देविदास गावित, नामदेव भांगरे, डॉ. अमोल वाघमारे, उद्धव पौळ, अर्जुन आडे, शंकर सिडाम, ॲड. अजय बुरांडे, शामसिंग पाडवी, महादेव गारपवार आदी नेत्यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.
नाशिक जिल्ह्यातून आलेल्या वाहनांचा ताफा किसान सभेचे माजी राज्य अध्यक्ष व माजी आमदार जे. पी. गावीत, जिल्हा सचिव इरफान शेख, इंद्रजित गावीत आणि सुनील मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली घोटी येथे मुख्य मोर्चात सामील झाला.