वर्षा गायकवाड यांच्या प्रचाराची सांगता रोड शो व जनसंवाद यात्रेने

मुंबईची लूट थांबवण्यासाठी इंडिया आघाडीला बहुमताने  विजयी करा – वर्षा गायकवाड


वर्षा गायकवाड यांच्या प्रचाराची सांगता रोड शो व जनसंवाद यात्रेने

 

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही उत्तर मध्य मुंबई मतदार संघातील काँग्रेस इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रा. वर्षा गायकवाड यांनी जनतेशी संवाद साधत प्रचार केला. यावेळी रोड शो ही काढण्यात आला. मागील २० दिवस वर्षा गायकवाड यांनी उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघासह मुंबईतील इतर मतदारसंघ पिंजून काढले. मार्निंग वॉक, सोसायट्यांमधील रहिवाशांशी संवाद साधने, विविध प्रार्थना स्थळांना भेटी देणे व धर्मगुरूंचे आशिर्वाद घेतले, चौक सभा, जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून घराघरात जाऊन प्रचार करण्यात आला. जनतेने वर्षा गायकवाड यांच्या जनसंवाद यात्रेला व रोड शो ला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मागील १० वर्षापासून भारतीय जनता पक्षाच्या सरकारने मुंबईची लुट केली आहे. मुंबईमधील प्रकल्प, संस्था, गुंतवणूक ही मोदीशाह सरकारने पळवून नेली, मुंबई शहर हे आंतरराष्ट्रीय नावलौकिक असलेले शहर आहे पण मुंबईची ही ओळख पुसून मुंबईवर सातत्याने अन्याय केला आहे. राज्यातील शिंदे, फडणीस, पवार सरकार हे गुजरात लॉबीचे हस्तक असून मुंबईच्या विकासासाठी त्यांनी काहीही केलेले नाही. मुंबईतील मोकळ्या जागा, झोपटपट्टींच्या जागा धनदांडग्या उद्योगपतींच्या घशात घालून भूमीपुत्रांना बेघर करण्याचे षडयंत्र सुरु असताना राज्याचे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस, पवार गप्प बसले. मुंबईची लूट थांबवून मोठ्या आर्थिक मदतीसह शहरात विविध विकास योजना आणण्यासाठी महाविकास आघाडीच्या मुंबईतील सर्व सहाही उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

लोकसभेची ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे, ही निवडणूक स्वातंत्र्याची दुसरी लढाई असून केंद्रातील नरेंद्र मोदींच्या हुकूमशाही सरकाराचा पराभव करून इंडिया आघाडीचे सरकार आणले पाहिजे. उत्तर मध्य मुंबईतील जनतेने आपले बहुमुल्य मतदान देऊन संसदेत पाठवावे, मतदारसंघातील प्रश्नांसह मुंबई शहरातील लोकलची गर्दी, रेल्वे स्टेशनवरील सुविधा, महिला सुरक्षा, फेरीवाल्यांचे प्रश्न, प्रदुषण, रस्त्यांचे प्रश्न सोडवण्याबरोबरच केंद्र व राज्य सरकारमध्ये समन्वय साधून मुंबई शहराच्या विकासाठी लागणारा निधी आणण्याचा प्रयत्न करेन, असे आश्वासन वर्षा गायकवाड यांनी केले आहे.



Most Popular News of this Week