हैडलाइन

पालिकेच्या बेजबाबदार कारभारावर खासदार संतप्त; खोट्या अहवालांचा भांडाफोड करत अधिकाऱ्यांची खरडपट्टी

देवनार डम्पिंग ग्राऊंडमुळे शिवाजीनगर, गोवंडी, मानखुर्द परिसरातील नागरिकांचे जीवन अक्षरशः नरकयातना बनले असताना पालिका अधिकारी मात्र “सर्व काही सुरळीत” असल्याचा दिखावा करत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर खासदार संजय दिना पाटील यांनी जोरदार टीका करत बैठकीतच त्यांची कानउघाडणी केली.


चेंबूर पश्चिम येथील पालिका कार्यालयात आयोजित बैठकीत उप आयुक्त संध्या नांदेडकर, विविध विभागांचे अधिकारी, एमएमआरडीए, एसआरए, म्हाडा तसेच पालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मात्र बैठकीत नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत जबाबदारी झटकताना दिसून आले. त्यामुळे संतप्त झालेल्या खासदारांनी “लोक मरत आहेत आणि अधिकारी फक्त कागदोपत्री काम दाखवत आहेत” अशा शब्दांत प्रशासनावर हल्लाबोल केला. देवनार डम्पिंगमधून निघणाऱ्या विषारी वायू, दुर्गंधी आणि प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांना गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे. त्वचारोग, श्वसनाचे विकार आणि अकाली मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याची तक्रार नागरिकांनी बैठकीत मांडली. मात्र पालिका अधिकारी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगून स्वतःची पाठ थोपटत होते.

याचवेळी शताब्दी रुग्णालयातील गंभीर अनागोंदीचाही भांडाफोड झाला. रुग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध असल्याचा दावा मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला. मात्र खासदारांनी बैठकीतच एक धक्कादायक व्हिडीओ दाखवत अधिकाऱ्यांचे खोटेपण उघड केले. त्या व्हिडीओमध्ये स्वच्छता कर्मचारी रुग्णांना टाके मारताना तर सफाई कामगार ईसीजी काढताना दिसत होते. हा प्रकार समोर येताच बैठकीत एकच खळबळ उडाली. नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असताना अधिकारी खोटी माहिती देऊन जनप्रतिनिधींनाच दिशाभूल करत आहेत. लोकांना उपचार नाहीत, सुरक्षित घरे नाहीत, मूलभूत सुविधा नाहीत व अधिकारी मात्र सगळे अलबेल असल्याचे सांगत आहेत. हा सरळसरळ बेजबाबदारपणा आहे, अशा शब्दांत खासदारांनी प्रशासनावर ताशेरे ओढले.


नटवर पारेख कंपाऊंडमधील जर्जर इमारतींचा मुद्दाही बैठकीत गाजला. गेली तीन वर्षे दुरुस्ती रखडल्याने नागरिक जीव मुठीत घेऊन राहत आहेत. ठिकठिकाणी गळती, भेगा आणि धोकादायक परिस्थिती असूनही अधिकारी केवळ पाण्याचे बिल व मालमत्ता कर भरा, मग काम करू अशी भूमिका घेत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. बैठकीत प्रत्येक विभागाचा अधिकारी दुसऱ्या विभागाकडे जबाबदारी ढकलताना दिसत होता. नागरिकांच्या प्रश्नांबाबत कोणालाही गांभीर्य नसल्याचे पाहून खासदार संतप्त झाले. जर सर्व निर्णय वरिष्ठच घेणार असतील तर अशा बैठका घेऊन वेळ वाया घालवण्याचा काय उपयोग? नागरिकांच्या प्रश्नांवर कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही, अशी खरमरीत टीका त्यांनी केली. पालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा, निष्क्रियता आणि जनतेप्रती असलेली उदासीनता यामुळे संतप्त झालेल्या खासदारांनी अखेर बैठक सोडून बाहेर पडत अधिकाऱ्यांना आरशात चेहरा दाखवला. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या व फक्त कागदोपत्री कामे दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी यानंतर स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.


Most Popular News of this Week

चेंबूरमध्ये महादेव शिगवण...

चेंबूरमधील भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक १५४ चे नगरसेवक महादेव शिगवण...

भारताच्या आठवणींचा...

माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरैशी यांच्या ‘India and I – A Hundred Memories, Not a Memoir’ या...

नवी मुंबई महापालिका...

नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कंत्राटी कामगारांना ७५०० रुपये भत्ता...

VJTI वसतिगृहातील नरकयातना आणि...

​महाराष्ट्रातील अत्यंत नामांकित व ऐतिहासिक 'वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान...

अंगणवाडी सेविकेच्या...

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील नंबरवाडी अंगणवाडीत १८ वर्षांपासून...

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित...

बदलत्या युगात नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून महाराष्ट्र खो-खो...