बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित मनसादेवी तुलसीराम अगरवाल सर्वसाधारण रूग्णालय येथे डायलिसिस सुविधेचे लोकार्पण इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अॕड. आशिष शेलार यांच्या शुभहस्ते आज रविवार (दिनांक १ नोव्हेंबर २०२६) रोजी करण्यात आले.या सुविधेमुळे मूत्रपिंडाच्या आजारांनी ग्रस्त रुग्णांना डायलिसिस उपचार सहज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. मुक्ता किडनी एण्ड डायलिसिस केंद्राच्या माध्यमातून ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वर्षापोटी शेकडो रूग्णांना या सुविधेचा लाभ होणार आहे.
याप्रसंगी आमदार मिहिर कोटेचा, नगरसेवक प्रकाश गंगाधरे, नगरसेवक . नील सोमय्या, माजी नगरसेविका समिधा कांबळे, उपायुक्त शरद उघडे, प्रमुख वैद्यकीय अधिक्षक डॉ. चंद्रकांत पवार, मनसादेवी तुलसीराम अगरवाल सर्वसाधारण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजुसिंग राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. डायलिसिस सेवेच्या लोकार्पण प्रसंगी आशिष शेलार म्हणाले की समाजातील कोणत्याही रूग्णाला जेव्हा कधी डायलेसीसची गरज लागेल तेव्हा सहज, स्वस्त, योग्य उपचार सुविधा उपलब्ध व्हावी. रूग्णांची सेवा करण्याची संधी या पीपीपी तत्वावरील सेवेच्या माध्यमातून मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार . मिहिर कोटेचा म्हणाले की, मुलुंडवासीयांना आरोग्याच्या दृष्टीने ही दीपावलीच्या निमित्ताने भेट आहे.
रूग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील डायलिसिस केंद्राच्या ठिकाणी १० रूग्णशय्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मुक्ता किडनी एण्ड डायलिसिस संस्थेच्या माध्यमातून याठिकाणी आरोग्य कर्मचारी वर्ग सेवेत उपलब्ध असणार आहे. प्रतिदिन ५० रूग्णांसाठी विविध सत्रामध्ये डायलिसिस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत प्रत्येक रूग्णासाठी डायलिसिस सुविधेचा लाभ ५ लाखांच्या वार्षिक मर्यादेपर्यंत घेता येईल. तसेच योजनेवेयतिरिक्त इतर रूग्णांसाठी अत्यल्प दरात डायलिसिस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मनसादेवी तुलसीराम अगरवाल सर्वसाधारण रुग्णालय येथे १० रुग्णशय्यांचे अत्याधुनिक डायलिसिस केंद्र उभारण्यात आले असून, हे केंद्र 'नागरी आरोग्य सहयोगाने ’ (Civic Health Collaboration) अंतर्गत समर्पित करण्यात आले आहे. याआधी मनसादेवी तुलसीराम अगरवाल सर्वसाधारण रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले होते. रुग्णालयातील सुविधा
सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या ११० रुग्णशय्यांसाठी सर्व आवश्यक आरोग्य सुविधा पुरवल्या जात आहेत. यामध्ये वैद्यकीय, शल्यचिकित्सा, अस्थिव्यंग, कान-नाक-घसा, नेत्र, बालरोग, त्वचाविकार, दंतरोग, रक्तदाब-मधुमेह, तसेच प्रयोगशाळा सेवा यांचा समावेश आहे. तसेच रुग्णालयात डीएनबी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आवश्यक तज्ज्ञ डॉक्टरांची (DNB Teachers) नियुक्ती करण्यात येत आहे.