पूजा राठोड आत्महत्या प्रकरण: शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या विरुद्ध भाजप महिला कार्यकर्त्यांचा रास्ता रोको आंदोलन
मुंबई: पूजा राठोड आत्महत्या प्रकरणी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या विरुद्ध भाजप कार्यकर्ते विशेषतः महिला आघाडी आता चांगलीच आक्रमक झाली आहे.
चेंबूर मधे भाजप महिला आघाडीच्या वतीने संजय राठोड आणि सरकार विरोधात घोषणाबाजी करत रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला.
चेंबूरच्या सायन पनवेल महामार्गावर सर्वात व्यस्त असलेल्या स्वामी विवेकानंद चौकात भाजप महिला आघाडीच्या मुंबई अध्यक्षा शीतल गंभीर आणि नगरसेविका आशा मराठे यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको करणार होत्या, त्यांच्यासोबत 100 ते सव्वाशे महिला होत्या पण पोलिसांनी ह्या महिला रस्त्यावर उतरण्यापूर्वीच त्यांना ताब्यात घेतलं.
या महिलांना ताब्यात घेत पोलिसांच्या गाडीत भरून चेंबूर पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
वन मंत्री संजय राठोड यांची मंत्री मंडळातून हकालपट्टी करावी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजप महिला आघाडीने केली आहे.