मनसेच्या दणक्यानंतर रुग्णालय वठणीवर -12 वर्ष काम करणाऱ्या मराठी कामगारांना पुन्हा कामावर घेण्याचे आश्वासन

मनसेच्या दणक्यानंतर रुग्णालय वठणीवर


12 वर्ष काम करणाऱ्या मराठी कामगारांना पुन्हा कामावर घेण्याचे आश्वासन 


मुंबई: घाटकोपर मधील झायनोव्हा रुग्णालयात गेल्या 10 ते 12 वर्ष काम करणाऱ्या 21 मराठी कामगारांना रुग्णालयातून अचानक कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ बुधवारी सांयकाळी मनसे कार्यकर्त्यानी रुग्णालयाला घेराव घातला . मनसेचे कामगार नेते गजानन राणे यांच्या नेतृत्वाखाली विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार सेना चिटणीस राज पार्टे यांनी पदाधिकाऱ्यासह झायनोव्हा रुग्णालयाला काल धडक दिली. आधीच लॉकडाऊन मध्ये सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत व त्यातही आहे त्या नोकरीत समाधान मानून काम करणाऱ्या कामगारांना लॉकडाऊन काळात अचानक कामावरून काढून टाकून त्यांच्या पोटाचा घास काढून अन्याय करणाऱ्या झायनोव्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांना रुग्णालयाच्या बाहेर पडू देणार नाही असा इशारा देत अधिकाऱ्याना वठणीवर आणले. यावेळी रुग्णालयाचे अधिकारी शिवाजी दुबे यांनी शनिवार पर्यंतचा वेळ मागत सर्व कामगारांना आम्ही सेवेत रुजू करून घेऊ असे आश्वासन दिले. यावेळी विद्यार्थी सेना प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रमोद मांढरे , उपशाखाध्यक्ष राजू खातू , सामाजिक कार्यकर्ते सोनू पवार आदी उपस्थित होते. 


प्रतिक्रिया :

योगेश कांबळे ( कामगार , झायनोव्हा रुग्णालय ) : मी नुकतेच तीन महिन्यांपूर्वी या रुग्णालयात कामगार म्हणून रुजू झालो. झायनोव्हा रुग्णालयाची नवीन इमारत बांधण्यात आली आहे. त्यात आम्हाला घेण्यात येईल असे आश्वसन दिले होते. मात्र पगार घेण्यास गेलो असता अधिकाऱ्यानी आम्हाला परत घेतले जाणार नाही असे सांगितले. मी तरी तीन महिन्यांपूर्वीच कामावर लागलो आहे मात्र जे 10 ते 12 वर्ष मराठी कामगार काम करत आहेत हा त्यांच्यावर अन्याय म्हणावा नाही का. मनसेकडे सर्व कामगारांनी तक्रार केल्यानंतर रुग्णालयाने शनिवार पर्यंत सर्व कामगाराना पुन्हा घेऊ असे कळवले आहे. त्याबद्दल मनसेचे आम्ही आभार मानतो


राज पार्टे ( मनसे कामगार चिटणीस ): रुग्णालयाने कामावरून अचानक काढून टाकल्याची आम्हाला तक्रार आली .सर्वच कामगार हे मराठी आहेत. मुंबईत मराठी माणसावर अन्याय होत असेल तर मनसे गप्प भूमिका कशी घेईल. पक्षच मराठी माणसाच्या हितासाठी आहे. रुग्णालयाच्या अधिकाऱ्याना आम्ही मनसेच्या भाषेत सांगितले. त्यांनी शनिवार पर्यंत कामगारांना कामावर घेतो असे सांगितले आहे. तसे झाले नाही तर मनसे आंदोलन काय असते याची झलक मग त्यांना बघावी लागेल. 



छायाचित्र : निलेश मोरे



Most Popular News of this Week