अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना टपाली मतदान करण्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे आवाहन
28- मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातील अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना १६ मे रोजी मतदानाची मिळणार अंतिम संधी:निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर
मुंबई उपनगर : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २८ – मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात २० मे २०२४ रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या मतदारसंघाच्या विक्रोळी येथील निवडणूक अधिकारी कार्यालयात अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी १४ मे २०२४ पासून टपाली मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. १६ मे २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत उर्वरित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदान करता येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील जास्तीत जास्त अधिकारी आणि कर्मचारी यांनी टपाली मतदान करावे, असे आवाहन २८ – मुंबई उत्तर पूर्वचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी केले आहे.
१४ मे रोजी विक्रोळी येथील पिरोजशहा नगर, सांस्कृतिक सभागृहातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात अत्यावश्यक सेवेतील १६०६ कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. आज दुपारपर्यंत साधारण ७०० मतदारांनी मतदान केले आहे. गुरुवार दिनांक १६ मे २०२४ रोजी संध्याकाळी ५.०० ही प्रक्रिया बंद करण्यात येणार आहे. यासाठी २८ – मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातील अत्यावश्यक सेवेतील जास्तीत जास्त अधिकारी आणि कर्मचारी यांनी मतदान करावे.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि अधिकारी यांच्या सुविधेसाठी विक्रोळी येथील कार्यालयात मतदान केंद्रे उभारण्यात आले आहेत. तसेच ओळखपत्रांची तपासणी करण्यासाठी व आलेल्या मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे, असेही निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दातकर यांनी सांगितले आहे.