मुंबईत मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासाच्या अनुषंगाने महानगराला अनुरूप अशा स्वरूपाचे सर्वेक्षण आणि उपाययोजना करण्याची गरज आहे. मुंबईतील टोलेजंग इमारतींमध्ये वाढणारी कुटुंबांची संख्या, लोकसंख्या आणि पायाभूत सुविधा पुरविण्याच्या मर्यादा याअनुषंगाने सविस्तर अभ्यासाची गरज आहे. मुंबई महानगराच्या भविष्याच्या अनुषंगाने धोरणांची आखणी, उपाययोजना आणि विकास आराखड्यातील तरतुदीच्या अनुषंगाने नियोजन गरजेचे आहे. मुंबईच्या भविष्यकालीन नियोजनामध्ये ‘सी ४० सिटी’ यासारख्या संस्थांनी योगदाने द्यावे, असे आवाहन महापौर रितू तावडे यांनी केले. मुंबईच्या महापौर रितू राजेश तावडे यांची आज (दिनांक १६ नोव्हेंबर २०२६) सी ४० सिटीज संस्थेचे कार्यकारी संचालक मार्क वॉट्स यांनी भेट घेतली.
महापौर रितू राजेश तावडे यांनी सी ४० सिटी सुकाणू समितीचे उपाध्यक्ष भूषवावे आणि दक्षिण तसेच पश्चिम आशियाचे नेतृत्व करावे, असे आवाहन संस्थेचे कार्यकारी संचालक मार्क वॉट्स यांनी याप्रसंगी केले. उपायुक्त (पर्यावरण) अविनाश काटे, ‘सी ४० सिटीज’ संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक श्रुती नारायण, प्रादेशिक संचालक केरूवाला आदी उपस्थित होते.महापौर म्हणाल्या की, मुंबई महानगराच्या अनुषंगाने एल निनोचा प्रभाव, वायू प्रदुषण, वाढती उष्णता यासारखी महत्वाची आव्हाने आहेत. मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा प्रकल्पांची उभारणी सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बांधकामाचा राडारोडा निर्माण होत आहे. त्यासोबतच पायाभूत सुविधांवरही या विकासाचा ताण निर्माण होत आहे. यानिमित्ताने मुंबई महानगरातील लोकसंख्येची मर्यादा, पुनर्विकासानंतर महानगरात नव्याने उभ्या राहणाऱया इमारतींमध्ये कुटुंबांची वाढती संख्या,इमारतीच्या विकासातून निर्माण होणारा राडारोडा व्यवस्थापन अशा सर्व बाबींवर ‘सी ४० सिटीज’ सारख्या संस्थेने सविस्तर सर्वेक्षण करून अभ्यास करावा. मुंबईसाठी राबविता येतील अशा उपाययोजना सुचवाव्यात. तसेच उपाययोजनांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करावा, असेही आवाहन महापौरांनी केले.
मुंबईत २२०० किलोमीटर लांबीचे सिमेंट कॉंक्रिटचे रस्ते विकसित करण्यात येत आहेत. रस्ते विकास प्रक्रियेत पावसाचे पाणी झिरपण्याच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याची गरज आहे. तसेच टोलेजंग इमारतींमध्ये भूमिगत वाहनतळाच्या ठिकाणीही अधिकाधिक पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठीची व्यवस्था असणे गरजेचे आहे. यासाठी सी ४० सारख्या संस्थांनी उपाययोजना सुचवाव्यात, असेही महापौर म्हणाल्या. भारतात अहमदाबाद येथे उष्णतेच्या लाटेच्या अनुषंगाने आगाऊ सूचना देणाऱ्या अद्ययावत तंत्रज्ञानाची अंमलबजावणी सी ४० सिटीजच्या माध्यमातून करण्यात आली आहे. ‘एल निनो’ च्या पार्श्वभूमीवर मुंबईची स्थिती सी ४० सिटीजच्या व्यासपीठावर महापौरांनी मांडावी, असे आवाहन संस्थेचे कार्यकारी संचालक मार्क वॉट्स यांनी केले. मुंबई महानगराच्या गरजांच्या अनुषंगाने प्रगत तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत वॉट्स याप्रसंगी म्हणाले.
मुंबई महानगरांचा जागतिक दर्जाचा लौकिक आहे. या महानगराच्या विकासाच्या अनुषंगाने अधिकाधिक चांगल्या उपाययोजनांची अंमलबजावणी शहरासाठी करण्यासाठी ‘सी ४०’ सारख्या संस्थांनी प्रयत्न करावेत. तसेच शहराच्या गरजेनुसार अधिक प्रभावी तंत्रज्ञानाची सांगड घालावी, असे आवाहन महापौर रितू तावडे यांनी केले.
C40 Cities हे जवळपास १०० आघाडीच्या शहरांचे एक जागतिक जाळे आहे. ही शहरे महत्वाकांक्षी, विज्ञानाधारित आणि लोककेंद्रित हवामान कृतींना गती देण्यासाठी कटिबद्ध आहेत. C40 चे शहरांसाठीचे मुख्य महत्त्व म्हणजे जागतिक शहर नेतृत्व समुदायाचा एक भाग होण्याची संधी. या माध्यमातून जगभरातील विविध शहरांकडून परस्पर अनुभवांची देवाणघेवाण, ज्ञान आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवता येते. C40 चे सदस्यत्व शहरांना शहर-केंद्रित संबंध आणि जागतिक स्तरावर आपली भूमिका मांडण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देते. यामुळे शहरांना U20 (Urban 20) - G20 च्या अंतर्गत होणाऱया आंतरराष्ट्रीय चर्चा आणि प्रक्रियांमध्ये आपली प्राधान्ये व दृष्टिकोन मांडता येतात.