टपाल नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाजारपेठ अन् उरण नाका परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा; वाहतूक पोलिसांचा अभाव!
पनवेल शहरात ठरवून दिलेल्या वेळेचे उल्लंघन करून मालवाहू वाहने सर्रास प्रवेश करत असल्याने शहरात वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. टपाल नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाजारपेठ आणि उरण नाका परिसरात वाहनांच्या गर्दीमुळे नागरिकांना तासन्तास अडकून पडावे लागत आहे. विशेष म्हणजे, या महत्त्वाच्या चौकांमध्ये वाहतूक पोलिस तैनात नसल्याने वाहनचालकांकडून नियमांना खुलेआम हरताळ फासला जात आहे. मालवाहू वाहनांच्या प्रवेश वेळेवर नियंत्रण आणि वाहतूक पोलिसांची नियमित नियुक्ती करण्याची जबाबदारी प्रशासन पार पाडणार कधी? असा संतप्त सवाल पनवेलकरांकडून उपस्थित केला जात आहे.