लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर दिवसेंदिवस हल्ल्यांचे प्रमाण वाढत असून, आता पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. राजकीय व्यक्तींकडून पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांनंतर आता पोलीस यंत्रणेतील काही कर्मचाऱ्यांकडूनही पत्रकारांना मारहाण होण्याच्या घटना समोर येत असल्याने लोकशाही व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नवी मुंबई येथील महिला पत्रकार प्रिया खंडागळे यांच्याशी संबंधित मारहाणीच्या कथित घटनेचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गांवकरीचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याची तातडीने गडचिरोली येथे बदली करावी, पत्रकाराची जाहीर माफी मागावी आणि गृह विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी आक्रमक मागणी त्यांनी केली आहे.
नवी मुंबई परिसरात सुरू असलेल्या कथित कुंटणखान्यांच्या व्यवसायाबाबत स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीवरून पत्रकार प्रिया खंडागळे यांनी वृत्त प्रसिद्ध केले होते. संबंधित परिसराची बदनामी होऊ नये आणि तेथील अवैध व्यवसाय बंद व्हावेत, अशी स्थानिक नागरिकांची भूमिका असल्याचे या वृत्तातून मांडण्यात आले होते. मात्र, या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर संबंधित महिला पोलीस अधिकाऱ्याकडून पत्रकार तरुणीला मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. पत्रकाराने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताबाबत आक्षेप असल्यास कायदेशीर मार्गाने आपली बाजू मांडता आली असती; परंतु मारहाण करणे हा कोणत्याही परिस्थितीत पर्याय होऊ शकत नाही, असे डॉ. आरोटे यांनी स्पष्ट केले.
पत्रकार प्रिया खंडागळे या धाडसी महिला पत्रकार असून, त्यांनी समाजहिताचा विषय मांडल्याबद्दल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत असल्याचे डॉ. आरोटे यांनी नमूद केले. पत्रकार कोणत्याही राजकीय पक्षाच्या आधारावर काम करत नाहीत. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, अन्याय, भ्रष्टाचार आणि समाजातील चुकीच्या प्रवृत्ती यांना वाचा फोडणे हेच पत्रकारांचे कर्तव्य आहे. पाकिट पत्रकारिता न करता दिवसभर आपल्या दैनंदिन जबाबदाऱ्या सांभाळून जनतेच्या प्रश्नांसाठी काम करणारे असंख्य पत्रकार राज्यात कार्यरत आहेत. अशा पत्रकारांना संरक्षण मिळण्याऐवजी त्यांच्यावर हल्ले होत असतील तर ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.पत्रकार प्रिया खंडागळे यांच्यावरील हल्ल्याच्या आरोपांची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याची बदली करून पत्रकाराची माफी मागण्यात यावी. अन्यथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा डॉ. विश्वासराव आरोटे यांनी दिला. दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळातही जनतेच्या सुरक्षेसाठी आणि समाजहितासाठी काम करणाऱ्या पत्रकारांनाच रस्त्यावर उतरावे लागले तर ही प्रशासनासाठी चिंतेची बाब ठरेल. पत्रकार पोलिसांना सहकार्य करतात; मात्र पत्रकारांच्या सन्मानाचा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यास तेही अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरतील. पत्रकारितेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, कारण हा आवाज कोण्या एका व्यक्तीचा नसून सर्वसामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांचा आहे, असा ठाम इशाराही त्यांनी दिला.