हैडलाइन

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मुख्यमंत्री श्री. पटेल यांना आज प्रत्यक्ष भेटून केलेल्या प्रयत्नांना यश, मुंबईला महापौरांकडून दिवाळी भेट


मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात (राणी बाग) आशियाई सिंह दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्यासंदर्भात मुंबईच्या महापौर रितू राजेश तावडे यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांची गांधीनगर (गुजरात) येथील मुख्यमंत्री निवास येथे आज (दिनांक ४ नोव्हेंबर २०२६) सायंकाळी प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. ही भेट अतिशय सकारात्मक व फलदायी ठरली आहे. 


याबाबत, लवकरात लवकर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून, जुनागढचे साकरबाग प्राणिसंग्रहालय आणि मुंबई प्राणिसंग्रहालय यांच्यादरम्यान सामंजस्य करार करण्याचे निर्देश गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांनी गुजरात राज्य प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेला लवकरच गुजरात शासनाकडून मंजुरीचे लेखी पत्र आणि सामंजस्य करार मसुदा प्राप्त होणार आहे. या मंजुरीमुळे मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मुंबईला एकप्रकारे दिवाळी भेट दिली आहे.


या भेटीवेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, मुंबईच्या महापौर  रितू तावडे यांच्यासह ध्रंगध्रा विधानसभा मतदारसंघाचे आमदार  प्रकाशभाई वरमोरा, गुजरात मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव संजीव कुमार, क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष जक्षय शाह, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संचालक (प्राणिसंग्रहालय) डॉ. संजय त्रिपाठी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.गुजरातचे वन राज्यमंत्री प्रवीणकुमार माळी यांचीदेखील मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी आज गांधीनगर येथे भेट घेतली. मुंबई प्राणिसंग्रहालयाला आशियाई सिंह लवकर द्यावेत, यासाठी वन विभागाला योग्य ते निर्देश देण्याची विनंती महापौरांनी राज्यमंत्री  माळी यांना केली. त्यावर,  माळी यांनीदेखील महापौरांचे निवेदन स्वीकारून त्यावर तत्काळ शेरा लिहून वन खात्याच्या प्रधान सचिवांना कार्यवाहीचे निर्देश दिले. 


गुजरातमधील जुनागढ येथील प्रसिद्ध साकरबाग प्राणिसंग्रहालयाकडून मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयासाठी दोन जोड्या (२ नर व २ मादी) आशियाई सिंह देण्याचा प्रस्ताव आहे. या बदल्यात मुंबई प्राणिसंग्रहालयातर्फे तीन जोड्या टफ्टेड कॅपुचिन माकडे (Tufted Capuchin Monkeys) साकरबाग प्राणिसंग्रहालयास देण्यात येणार आहे. दोन्ही प्राणिसंग्रहालयांनी या देवाणघेवाणीस आधीच संमती दर्शविली आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण (CZA) (नवी दिल्ली) यांच्या अंतिम मान्यता प्राप्त आराखड्यानुसार (मास्टर लेआऊट प्लॅन) मुंबई प्राणिसंग्रहालयात आशियाई सिंहांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे अत्याधुनिक निवासस्थान (Exhibit) सज्ज करण्यात आले आहे.मुंबईच्या महापौर  रितू राजेश तावडे यांच्या या सक्रिय पुढाकारामुळे दोन्ही राज्यांमधील वन्यजीव संवर्धन सहकार्याला नवी दिशा मिळाली आहे. ही भेट महाराष्ट्र आणि गुजरात यांच्यातील नैसर्गिक वारसा व परस्पर सौहार्दाचे उत्तम प्रतीक ठरणार आहे.


Most Popular News of this Week

मुंबईच्या महापौर रितू तावडे...

महात्मा जोतिबा फुले मंडई (पूर्वीचे क्रॉफर्ड मार्केट) हे मुंबईतील ऐतिहासिक...

KNOW YOUR ARMY EVENT INAUGURATED IN MUMBAI

The Indian Army inaugurated a three-day "Know Your Army" - Mega Equipment & Motivational Exhibition at the Colaba Military Station, Mumbai, on 29 October 2026. The event was inaugurated by Lt Gen...

एमआयडीसीतील कंपन्यांची...

 जिल्ह्याला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी रत्नागिरी...

बाह्यस्रोत आरोग्य...

 नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत मे. डी. एस. एंटरप्रायझेस यांच्या...

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा...

 प्रमाणात कचरा साचण्याच्या संभाव्य ठिकाणांचे (Garbage Vulnerable Points – GVPs) निर्मूलन...

मुंबईतील वायू गुणवत्ता...

मुंबईतील वायू गुणवत्ता राखण्यासाठी तसेच रस्त्यांवरील धूळ आणि बांधकाम व...